माझी शाळा - मराठी निबंध


"माझी शाळा" या विषयावर १० ओळी. 

(त्याखाली ४४० शब्दांचा सविस्तर निबंध आहे.)
  • माझे शाळेचे नाव 'महात्मा जोतीराव फुले विद्या मंदिर' आहे.
  • माझ्या शाळेभोवती एक मोठे मैदान आहे.
  • शाळेच्या आवारात एक सुंदर बाग आहे.
  • माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर आहे.
  • शाळेत एक मोठे सभागृह आहे.
  • शाळेत एक भरपूर पुस्तकांचे सुंदर ग्रंथालय आहे.
  • माझ्या शाळेत विज्ञानाची व संगणकाची सुसज्ज प्रयोगशाळा आहे.
  • शाळेतील शिक्षक खूप प्रेमळ, समजदार आणि गुणवंत आहेत.
  • शाळेतील विद्यार्थी खूप हुशार आणि उत्साही आहेत.
  • शाळेत अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • आम्हाला त्यात सहभागी होण्याची संधी मिळते.
  • माझी शाळा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.
  • माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे.
  • मी माझ्या शाळेवर खूप प्रेम करतो.

माझी शाळा 

            आपले जीवन घडवण्यात शाळा महत्त्वाची भूमिका बजावते. आपली शाळा  शिक्षणासोबतच शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढीचा पाया देखील मजबूत करते. अशा शाळेचे आपल्या हृदयात कायमचे विशेष स्थान असते. याप्रकारेच “नवयुग प्राथमिक विद्यामंदिर” या शाळेचे माझ्या हृदयात अढळ स्थान आहे. ही माझी एक छोटीशी शाळा नाशिक जिल्ह्यात सावगा या छोट्याशा खेड्यात आहे.

माझी शाळा माझ्या घराच्या जवळच आहे. त्यामुळे मी माझ्या काही मित्रांसोबत हसत-खेळत, गमती-जमती करत चालतच शाळेला जातो. ही सरकारी अनुदानित शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून फी घेण्यात येत नाही. येथे विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, गणवेश आणि दुपारचे जेवण विनामूल्य दिले जाते. वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यावेळी  काही विद्यार्थ्यांना औषधे पण दिली जातात. येथे आम्ही मातृभाषेतून शिकत असल्यामुळे अभ्यासाचे ओझे वाटत नाही. वर्गात शिकवलेले सर्व काही नीट लक्षात राहते. मातृभाषा मराठी सोबतच आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी व हिंदी पण खूप चांगले येते. त्यासाठी येथील शिक्षक विशेष प्रयत्न करतात.

माझी शाळा या परिसरात शैक्षणिकदृष्ट्या एक उत्कृष्ट शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. शाळेचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी आणि पालकवर्ग सर्वजण मिळून प्रयत्न करतात. शाळेतील वातावरण नेहमी उत्साही, खेळीमेळीचे आणि शिक्षणाला पूरक असे असते. आमचे शिक्षक स्वभावाने खूप प्रेमळ व आमची काळजी घेणारे आहेत. शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि शैक्षणिक साधने वापरतात. त्यामुळे त्यांचे शिकवणे आम्हाला आवडते व लक्षातही राहते. 

माझ्या शाळेतील वर्ग खोल्या ऐसपैस आणि हवेशीर आहेत.  येथील वर्ग संगणक,  प्रोजेक्टर व इतर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. आम्ही काढलेली चित्रे, सुंदर अक्षरात लिहिलेले सुविचार, कार्यानुभवात तयार केलेल्या सुंदर वस्तू, थोर व्यक्ती, शास्त्रज्ञ, लेखक अशांचे फोटो इत्यादींनी  शाळेचे वर्ग सजवले आहेत. शाळेत विविध पुस्तकांनी सजलेले वाचनालय म्हणजे आमच्यासाठी ज्ञानाचा खजिना आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी प्रसाधनगृहे, पिण्याचे शुद्ध पाणी यांची चांगली सोय आहे. आमच्या शाळेत संगणकाची, विज्ञानाची, भाषेची,  भूगोलाची  प्रयोगशाळा  आहे, आमच्या शाळेची एक बाग आहे. तिथे आम्ही भाज्या, फळे आणि फुले वाढवतो.  बागेच्या एका कोपऱ्यात आम्ही काही कोंबड्या, २ शेळ्या आणि २ गायी पाळल्या  आहेत. याला आम्ही गमतीने शाळेचे फॉर्म हाऊस असे म्हणतो. 

शाळेत फक्त २00 विद्यार्थी असल्यामुळे आम्ही सर्व एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतो. एकमेकांच्या घरी पण जातो. आम्ही अनेकदा अभ्यासात एकमेकांना मदत करतो आणि सुट्टीच्या वेळी एकत्र खेळतो. आमचे शिक्षकही आम्हाला, आमच्या घरच्या लोकांना नावासहित छान ओळखतात.  त्यामुळे ते आम्हाला आमच्या घरचे नातलगच वाटतात. 

आमच्या शाळेत मोठे मैदान आहे. तेथे आम्ही क्रिकेट, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल असे वेगवेगळे अनेक मैदानी खेळ खेळतो. आमच्या शाळेत विविध खेळांची अनेक साधने आहेत. शाळेतील आणि शाळेबाहेरच्या विविध स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेतो. शाळेमध्ये विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी साजरे केले जातात. यामुळे आम्हाला आमच्या परंपरा आणि संस्कृती यांच्याविषयी माहिती होते. 

माझ्या शाळेने माझी कौशल्ये व क्षमता यांच्या विकासाची सतत संधी दिली, विविध ज्ञान दिले, आम्हाला विविध शैक्षणिक अनुभव दिले, आमच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केलेत, एक चांगला नागरिक म्हणून आमच्या जीवनाचा पाया मजबूत केला. सत्य, शिव आणि सुंदर असलेल्या माझ्या या शाळेला मी मनापासून नमस्कार करतो. 

©