रस्त्यावरच्या कुत्र्याचे आत्मचरित्र


मी एक भटका कुत्रा आहे, मी अनेक वर्षे रस्त्यावर जगलो आहे. घर नाही, आसरा नाही, सोबतच्या माझ्यासारख्याच चार-पाच कुत्र्यांबरोबर कसातरी जगत होतो. मला नाव पण नव्हते. माझे आई-बाबा कोण आहेत, कुठे आहेत, काय करत आहेत याविषयी मला काहीही माहिती नाही. मला भाऊ बहिणी आहेत की नाही याविषयी काही माहिती नाही. अनेक संकटांमधून व जीवनातील अनेक आव्हानांमधून माझे आयुष्य गेले आहे. अशा या माझ्या क्षुल्लक  जीवनाची कथा काय सांगणार? तरीपण माझी आत्मकथा सांगण्याचा प्रयत्न करतोय…

जन्मल्यापासून माझी जगण्याची धडपड सतत सुरू होती. त्यातून मला काही आठवत असलेल्या माझ्या सुरुवातीच्या आठवणी अनपेक्षित आणि भयानक आहेत. पण कशीही परिस्थिती असली तरी मला दोन घास मिळण्यासाठी दिवसभर वणवण भटकावे लागायचे. अन्न शोधणे हे माझे दैनंदिन व्रत बनले होते. कचरापेटी ही मला दोन घास मिळण्यासाठी भरवशाचा आधार होता. यातूनच मी माझ्या स्वतःवर अवलंबून राहण्यास शिकलो. कठीण परिस्थितीला तोंड देणे शिकलो.

रस्त्यावरचे जीवन अतिशय भयानक होते. काही लोक उगीचच मला काठीने झोडपून काढायचे. मी त्यांचे काहीही बिघडवलेले नव्हते. काही लोक मला उगीचच दगड मारत. दिवाळीच्या वेळी माझ्या शेपटीला डबा बांधून त्यात फटाके फोडत. पावसाळ्याचे दिवस मला अतिशय त्रासाचे जात. असे असले तरी अधून मधून काही प्रेमळ दयाळू लोकांचे अनुभव सुख समाधान देऊन जात. पलीकडच्या हॉटेलमधला एक मुलगा मला कधीतरी एखादा पाव किंवा वडा देऊन जायचा. एखादा शाळकरी मुलगा माझ्या डोक्यावर थाप मारून मला आनंद द्यायचा.

मागच्या वर्षी मला एका अत्यंत भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागले. माझ्या गळ्याला एक मोठा फोड झाला. तो पिकला आणि त्याच्या मधून अत्यंत घाण असा पू वाहू लागला. त्यातून मोठा दुर्गंधही येऊ लागला. त्यातील वेदनेने मला जीवन नकोसे करून टाकले. मी दिसलो की कोणीही मला दगड काठ्या मारून हाकलून लावायचे. तशातच मला एक दयाळू मुलगा मिळाला. माझ्या गळ्यावरील जखम बघून त्याने कोणत्यातरी जनावरांच्या डॉक्टरांना माझी माहिती दिली. त्या डॉक्टरांच्या गाडीमधून मला त्यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी माझी जखम धुवून काढली, त्यावर औषधे लावली आणि मोठी पट्टी बांधली. त्या मुलाने मला एक चपाती खायला दिली. आता मला जरा बरे वाटू लागले. तो मुलगा निघून जाऊ लागला, तेव्हा मी पण त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. त्याच्या घराच्या बाहेर बसून राहिलो.

तो मला डॉक्टरांकडे न्यायचा. औषध पाणी करायचा. खायला पण काही ना काहीतरी रोज द्यायचा. काही दिवसातच माझ्या गळ्याचा आजार नाहीसा झाला. लवकरच त्याची व माझी मैत्री अगदी घट्ट झाली. त्याचे नाव सचिन आहे हे मला केव्हातरी कळले. मी त्याच्या अंगणात, त्याच्या ओसरीत राहू लागलो. तो माझ्याबरोबर रोज काही ना काही खेळायचा. त्याने मला लकी हे नाव ठेवले. ते नाव मलाही आवडले. या अनुभवामुळे जगात चांगले लोकही आहेत, जीवनात दुःखानंतर कधी ना कधी सुख येऊ शकते याची मला जाणीव झाली. कशासाठी जगायचे हे पण आता लक्षात येऊ लागले.

या मुलाने माझ्यावर खूप मोठे उपकार करून ठेवले. त्याच्या उपकाराची परतफेड कशी करावी हे मला काही समजत नव्हते. एका दिवशी मात्र ती संधी चालून आली. एका मध्यरात्रीनंतर त्या गल्लीतले लोक गाढ झोपेत असताना काही संशयास्पद लोक तेथे आले. ते लोक चोर होते हे पण मला समजून आले. माझ्या लक्षात येईपर्यंत त्यांनी बाजूच्या दोन घरी चोरी केली होती. आता ते खिडकीतून सचिनच्या घरामध्ये शिरणार होते. मी थोडाही विचार न करता त्या चोरांच्या पायाला मोठमोठे चावे घेतले. त्यामुळे आरडाओरडा झाला, लोक जागे झाले. त्यांनी चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हापासून माझे दिवस अजून पालटले. त्या गल्लीतले सर्व लोक मला त्यांच्या घरचा सदस्यच मानू लागले. छान छान खायला प्यायला देऊ लागले. माझ्याबरोबर खेळू लागले.

आता मला नाव, घर, आपुलकी, सुरक्षितता इत्यादी सर्व काही मिळाले होते. आता मला माझ्या जीवनाचा उद्देश सापडला होता. येथे लोकांसोबत प्रेमाने राहणे, त्यांच्या घरांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे असे मला जाणवू लागले. हे कर्तव्य जास्तीत जास्त वर्षे मला करता यावे, हीच माझी शेवटची इच्छा असेल.
===========-

मनोरंजक संवादलेखनासाठी लिंक- https://www.marathiguru.net/p/conversations.html