चिमणीची आत्मकथा

विशाल आकाशामध्ये, सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, वाऱ्याच्या लाटांवर आनंदाने झोके घेत भिरभिरणारी मी एक चिमणी आहे, या विस्तीर्ण जगामधील मी एक छोटीशी जीव आहे; पण माझी कहाणी विस्तीर्ण  क्षितिजाच्या पलीकडे साऱ्या विश्वाला गवसणी घालणारी आहे. मी या विश्वातील एक आश्चर्य आहे, आणि हे विलक्षण विश्व माझ्यामध्ये पुरेपूर विरघळले आहे. मला अनेक आश्चर्यकारक अनुभव आलेत, मला अनेक  छोटी मोठी आव्हाने झेलावी लागली. अतिशय रोमांचक अनुभवानी नटलेली माझी कहाणी तुम्हाला खूप खूप आवडेल. 

पिंपळाच्या एका उंच झाडांच्या दोन फांद्यामध्ये असलेल्या एका छोट्याशा घरट्यात  माझा जन्म झाला.  त्यावेळी तेथे माझ्यासारख्या छोट्या छोट्या चार-पाच पिल्लांचा एकच गोंधळ सुरू होता. आम्ही सर्व  पिल्ले गोंधळलेल्या अवस्थेत होतो. तिथे माझ्या आई-बाबांनी आमचे पालनपोषण केले, आमच्यासाठी दूरवर फिरून अन्न आणले, आम्हाला सुरक्षा दिली, आम्हाला आवश्यक त्या कृती शिकवल्या… आमचे आई-बाबाच  आमचे महान गुरु होते. 

माझ्या आई बाबांनी मला व माझ्या भावंडांना जमिनीवर चालणे व हवेत उडणे शिकवले. धडपडत,  चाचपडत चालण्याने आणि उडण्याने माझे पंख मजबूत झाले. मग एके दिवशी मी पहिल्यांदाच मोकळ्या आकाशात उड्डाण केले. रंग, गंध आणि चैतन्य यांनी भरलेले जग बघून मी उत्साहाने ओसंडून निघाले. जणू  निसर्गाचे हे अवर्णनीय सौंदर्य माझी वाटच पाहत होते! 

वयाने मोठ्या असलेल्या काही चिमण्या अचानक कुठल्यातरी संकटाविषयी बोलायला लागल्या.  या भागातील चिमण्यांना अन्न मिळू शकणार नाही-  असे काही त्यांच्या बोलण्यात होते. त्यामुळे हा प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जाण्याबद्दल सर्व चिमण्या एकमेकांना सांगू लागल्या. मी पण त्यांच्यात सामील झाले. माझ्या सोबतच्या चिमण्यांसह आमचा सर्वांचा अफाट अंतर ओलांडण्याचा एक कठीण प्रवास सुरू झाला. जंगले, पर्वत, नद्या, वाळवंट, शहरे, गावे ओलांडून आम्ही एका चांगल्या प्रदेशात पोचलो.

या प्रवासात एक आनंदाची आणि रोमांचक अशी गोष्ट घडली. एक सुंदर व सशक्त  जीवनसाथी मला मिळाला. छोट्या काड्या, गवत, कापूस, दोरे अशा वस्तू वापरून आम्ही  दोघांनी स्वतःचे  एक घरटे बांधले. काही दिवसात मला चार अंडी झाली. आता ती अंडी उबवण्याची आणि त्यातून येणाऱ्या पिल्लांची काळजी घेण्याची  हवीहवीशी  जबाबदारी आमच्यावर पडली.

काही दिवसांनी त्या अंड्यातून सुंदर व नाजूक पिल्ले बाहेर पडली. आम्ही त्यांची स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त काळजी घेऊ लागलो. बघता बघता ती पिल्ले मोठी झाली. एके दिवशी उडता उडता ती पिल्ले कुठेतरी निघून गेली. आम्ही त्यांची वाट पाहून थकून गेलो. एकदा तरी त्यांनी यावे व त्यांचे दर्शन आम्हाला व्हावे असे आम्हाला खूप वाटे. पण ती पिल्ले परत आली नाहीत. बहुतेक त्यांनी त्यांचे स्वतंत्र जीवन सुरू केले असावे.

अशातच एक भयानक वादळ आले. आमचे घरटे त्या वादळाने विस्कटून गेले. त्यातच जोराचा पाऊस आला.  त्या पाऊस पाण्यात आमचे घरटे वाहून गेले.  या गोंधळात माझा जोडीदार कुठेतरी हरवला.  बरेच दिवस मी त्याची वाट बघितली. तो जिवंत आहे की कुठेतरी गेला आहे हेही समजले नाही. प्रचंड दुःखात आणि भयाण नैराश्येत मी एकटीच आयुष्य पुढे ढकलू लागली. आजूबाजूच्या चिमण्या माझ्याजवळ येऊन माझे सांत्वन करीत असत,  मला धीर देत असत. अशा परिस्थितीत एक चिमणा माझ्या जीवनात आला. हा चिमणा खूप शहाणा आणि प्रेमळ आहे . आम्ही दोघांनी पुन्हा एक सुंदर असे घरटे बांधले. त्यात आमचा संसार सुरू केला. 

जीवनात सुखाची परिस्थिती नेहमीसाठीच टिकून राहील, असे नाही. तसेच जीवनातील काळोख्या दुःखात कुठून तरी आशेचा, सुखाचा किरण येतो व आपले जीवन आनंदाने भरून टाकतो, हे या छोट्याशा जीवनात मी शिकले. ही शिकवण मी माझ्या आजूबाजूच्या चिमण्यांना सतत देत असते. आता स्वतः आनंदी राहणे आणि इतरांच्या जीवनात आनंद पसरवणे हे माझे जीवनकार्य  बनले आहे. 

======-

मनोरंजक संवादलेखनासाठी लिंक- https://www.marathiguru.net/p/conversations.html