Photo- Wikimedia |
अर्धवट बनलेल्या इमारतीच्या सावलीत मी एक दमलेला-थकलेला मजूर त्या इमारतीकडे टक लावून पाहतो आहे. अशा उंच इमारती बांधण्यासाठी प्रचंड परिश्रम करणे, त्यातून पोटासाठी दोन वेळेचा भाकर तुकडा कसातरी मिळवणे, लोकांनी वापरून झाल्यावर दिलेल्या कपड्यानी शरीर झाकणे… हाच जणू माझा धर्म झाला आहे. या आत्मकथेत जीवन जगण्यासाठी माझा संघर्ष, आकांक्षा आणि आशा सांगणार आहे.
माझे आई-वडीलसुद्धा अशीच मजुराची नोकरी करायचे. येथून तेथे, तेथून येथे - या गावातून त्या गावात, त्या गावातून अजून कुठेतरी. सगळी भटकाभटकी. माझी एक लहान बहीण होती. एका दिवशी तिला फणफणून ताप आला. डॉक्टरांकडे जायला, औषध-पाण्याला घरात पैसा नव्हता. तिला झाडपाल्याचे घरगुती औषधे दिलीत. तीन दिवसातच ती आम्हाला सोडून गेली. लहानपणी शाळेचे दूरवरून तोंड पाहायचो, पण त्या शाळेमध्ये कधी जाऊन काही शिकता आलं नाही. थोडसं वय वाढल्यावर मी वडिलांच्या मजुरीला मदत करू लागलो. आणि तशातच हा धंदा पोटापाण्याचे माध्यम केव्हा बनला, हे कळले सुद्धा नाही.
पहाटेपासून सूर्य मावळण्यापर्यंत, मला प्रचंड परिश्रम करावे लागतात. माझे मूळ गाव खूप दूर आहे, तेथे कधी जाणे होत नाही. तेथील आमचे नातेवाईक कुठे आहेत, काय करतायेत, जिवंत आहेत की नाही … यापैकी काही एक माहिती नाही. माझ्या तुटपुंज्या पगारावर चार जणांच्या जबाबदारीचा भार माझ्या खांद्यावर आहे. मी सहन केलेल्या त्रासांपासून माझ्या दोन मुलांची सुटका व्हावी हीच माझी इच्छा आहे.
मी बांधकाम मजुरीच्या चक्रव्यूहात असा फसलो आहे की यातून निघण्याचा एकही मार्ग मला दिसत नाही, मी जे वेतन मिळवतो त्यातून माझ्या कुटुंबाच्या अन्न, निवारा आणि मुलांच्या शिक्षणाच्या गरजा कशातरी भागावतो. मुले जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत जातात. अलीकडे त्यांना पुस्तके, गणवेश मिळतात आणि महत्त्वाचे म्हणजे दुपारी खिचडी खायला मिळते. माझी मुले शहाणी आहेत. जगण्यासाठी माझा संघर्ष किती बिकट आहे, हे त्यांना माहित आहे. त्यामुळे ते कसलाही हट्ट माझ्याकडे धरत नाहीत. भरपूर अभ्यास करतात. वर्गात पहिला दुसरा नंबर असतो. शाळेतील एक शिक्षक तर माझ्या मुलाला त्याच्या बुद्धीमुळे ‘कलेक्टर साहेब’ म्हणतात. हे बघून मला खूप आनंद होतो.
आम्हाला कितीही त्रास झाला तरीही, मी त्यांना भरपूर शिक्षण देण्याचा निर्धार केला आहे.. आमच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या अडकलेल्या गरिबीच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत. माझ्या कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी माझ्या स्वत:च्या सुखसोयींची मी पर्वा करत नाही.
या अपूर्ण इमारतीच्या एका खोलीत आम्ही संसार थाटला आहे. संध्याकाळी, मी माझ्या मुलांना गोळा करतो, त्यांच्याकडून परवचा, पाढे, कविता व श्लोक सुरांत म्हणून घेतो. मोठ्या लोकांच्या गोष्टी सांगतो. माझ्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी मला लहानपणी सांगितलेल्या गोष्टी त्यांना सांगतो. त्यांच्या अभ्यासातलं मला काही कळत नाही. तरीही त्यांचा अभ्यास पूर्ण झाला काय, पूर्ण झालेला गृहपाठ शिक्षकांना दाखवला काय, शाळेत आज काय शिकवले, शाळेत इतर गमती जमती काय झाल्या ... इत्यादी विचारतो. मुलेही मोठ्या उत्साहाने याला प्रतिसाद देतात..
काही महिन्यांपूर्वी काम करताना माझ्या पायाचे हाड तुटले. आम्ही नवरा बायको दोघांनीही मजुरी केली तरच खर्च भागू शकायचा. पण डॉक्टरांनी मला दुरुस्त होण्यासाठी तीन-चार महिने लागतील असे सांगितले. मुलांच्या शिक्षणाचे कसे होणार, या प्रश्नाने जीव कळवळून जायचा. पण आमच्या बांधकामाच्या मालकांनी आमची परिस्थिती जाणून घेतली आणि मी कामावर न जाताही चार महिन्याचा पगार नियमितपणे मला दिला.
अशाप्रकारे आता मी इमारतच बांधतो आहे असे नाही तर माझ्या मुलांचे उज्वल भवितव्य ही बांधतो आहे. माझी मुले मोठी होतील, चांगल्या नोकरी धंद्याला लागतील, समाजात मानाचे स्थान मिळवतील. याची मला खात्री वाटते आहे. आणि या एकमेव आशेसाठी मिळालेला दिवसपूर्णपणे सत्कारणी लावतो आहे..
©